पाचोऱ्यात शिवसेना-उबाठा आक्रमक : फडणविसांच्या पुतळ्याचे दहन बदलापूर अत्याचारातील नराधमाला कठोर शिक्षा द्या : वैशालीताई सुर्यवंशी
पाचोरा, दिनांक २१ (प्रतिनिधी ) : बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला.
बदलापूर येथील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर शाळेत काम करणाऱ्या नराधमाचे अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. यातच सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न केल्याने काल बदलापूरवासियांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. या प्रकरणी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला आहे. तर स्थानिक पातळीवर वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर आज जोरदार निषेध करण्यात आला.
आज सकाळी वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. तर उपस्थितांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. बदलापूर घटनेने राज्याची मान खाली गेली असून गृहमंत्री म्हणून फडणवीस तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनाच्या नंतर आंदोलकांनी पोलीस निरिक्षक व तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यात बदलापूर येथील घटनेचा निषेध करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, भरतभाऊ खंडेलवाल, अभय पाटील, अरूण पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत, दीपक पाटील, राजेंद्र राणा, उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, उपशहर प्रमुख अनिल खंडेलवाल, पप्पू जाधव, संजय चौधरी, शहर प्रमुख विकास वाघ, योजनाताई पाटील, कुंदन पांड्या, जयश्री येवले, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, गजू पाटील, विकास वाघ, गजानन सावंत, संदीप पाटील, मनोज चौधरी, शशी पाटील, नितीन खेडकर, संतोष सर, निखील भुसारे, निखील सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, चंदू पाटील आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.