सिनेस्टाईल पाठलाग,पोलिसांचे वाहन पलटी..जीवाची बाजी …अन् डीझेल चोरट्यांना अटक.
सिनेस्टाईल पाठलाग,पोलिसांचे वाहन पलटी..जीवाची बाजी …अन् डीझेल चोरट्यांना अटक.
भडगाव-
जीवाची पर्वा न करता पळून जाणा-या संशयित वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत पळून जाणा-या तिघा डिझेल चोरट्यांना चाळीसगाव आणि भडगाव पोलिसांच्या अथक परिश्रमातून पकडण्यात यश मिळाले आहे. मात्र या सिनेस्टाईल आणि थरारक घटनेत पाठलाग करणा-या पोलिसांचे आणि पळून जाणा-या चोरट्यांचे वाहन उलटले. या घटनेत पोलीस पथकातील कर्मचारी आणि चोरटे जखमी झाले.
25 जुलैच्या रात्री चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार पो.कॉ.आशुतोष सोनवणे, पोलिस शिपाई रविंद्र बच्छे आणि पवन पाटील असे तिघे जण शासकीय वाहनाने रात्र गस्त करत होते. दरम्यान त्यांना MH-04-FA-3044 या क्रमांकाची स्विफ्ट डीझायर कार हिरापूर रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत फिरतांना आढळून आली. त्यामुळे रात्रगस्तीवरील इतर अंमलदारांच्या मदतीने त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. या संशयास्पद वाहनावरील वाहनचालकास पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने भडगावच्या दिशेने पळवले.
संशयास्पद वाहन भडगावच्या दिशेने पळून गेल्याने या बाबतची माहिती भडगाव पोलिसांना कळवण्यात आली. भडगाव पोलिस स्टेशनच्या रात्रगस्तीवरील कर्मचारी चालक पो.शि. संदिप सोनवणे व पो.ना. मनोहर पाटील, पो.ना.किरण पाटील आदींनी या वाहनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न केला. भडगाव येथे देखील पोलिस आपल्या मागावर असल्याचे दिसताच संशयित वाहनचालकाने यु टर्न घेत वाहन पुन्हा चाळीसगावच्या दिशेने पळवले,संशयीत वाहन पुन्हा चाळीसगाव शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच त्याचा अटकाव करण्यासाठी कजगाव नाका (भडगाव पो.स्टे.), पातोंडा गाव, खरजई नाका (चाळीसगाव पो.स्टे.) याठिकाणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार शशीकांत महाजन, पो.ना.महेंद्र पाटील, भुषण पाटील, पो.शि. राकेश महाजन, समाधान पाटील, विजय पाटील, पो.कॉ. सतीष पाटील व पिटर मोबाईल चालक पोहेकॉ नितेश पाटील, डी.बी. मोबाईल वरील चालक पो.कॉ. विजय महाजन आदींनी नागरिकांच्या मदतीने बॅरीकेट्स लावून नाकाबंदी केली.
मात्र तरीदेखील संशयीत भरधाव वेगातील वाहन चालकाने बॅरिकेट्स तुडवून नाकाबंदीवरील कर्मचा-यांच्या दिशेने त्यांच्या जिवीताची पर्वा न करता वाहन पळवले. घटनास्थळी हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी वेळीच प्रसंगावधान राखत ते बाजुला झाल्याने त्यांचा जीव वाचला मात्र ते जखमी झाले. चाळीसगाव शहरातील सिग्नल चौकात भडगाव पिटर मोबाईल व चाळीसगाव शहर पोलिसांनी शासकीय वाहनाने पाठलाग केला. भडगाव पो. स्टे. चे पिटर मोबाईलवरील पोलीस अंमलदार संदिप सोनवणे, मनोहर पाटील यांनी जिवाची पर्वा न करता ओव्हरटेक करुन संशयीत स्विफ्ट डीझायर कार चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र स्विफ्ट डिझायर मधील इतरांनी पोलिस कर्मचा-यांना जीवे ठार मारण्याची चिथावणी दिली. भडगाव पोलिसांच्या ताब्यातील सरकारी वाहनास मागून धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ते रस्त्यावर उलटून अपघातग्रस्त झाले.
संशयीत स्विफ्ट डिझायर कार चालकाचे देखील त्याच्या ताब्यातील वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावरील विजेच्या पोलवर जावून आदळले. स्विफ्ट डिझायर कार चालक व त्याच्या दोघा साथीदारांना पळून जाण्याची संधी न देता त्यांच्या मागावरील चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडण्यात यश मिळवले.
आकाश बाळासाहेब कुडे (रा. कोराडे ता. राहता जि. अहमदनगर), मनोज अशोक वाघमारे (रा. कालीका नगर, शिर्डी जि. अहमदनगर), आणि रशिद रफिक पठाण (रा. वाकळी ता. राहता जि. अहमदनगर) अशा तिघांना पकडण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेण्यात आली. त्यात डिझेल चोरीचे डीझेल भरण्यासाठी आठ रिकामे ड्रम, डिझेल काढण्यासाठी लागणारे दोन पाईप, एक पकड, एक स्कू ड्रायव्हर, एक लोखंडी सळई असे साहित्य आढळून आले.
भडगाव पो. स्टे. चे पोलिस नाईक मनोहर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांविरुद्ध गु.र.न. 328/2024 भारतीय न्याय संहीता कलम 109, 132,121(1) (2), 324(5) (6), 3(5) सह मोटार वाहन कायदा कलम 179,183,184, महा. पोलीस अधिनियम कलम 122 प्रमाणे अन्वये चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व भडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व पोहेकॉ राकेश पाटील हे पुढील तपास करत आहेत. या घटनेत भडगाव पो. स्टे. शासकीय वाहन उलटल्याने अपघातग्रस्त झाले आहे. त्यातील भडगाव पो. स्टे. चे अंमलदार पो.ना. मनोहर पाटील, पो.कॉ. संदिप सोनवणे तसेच चाळीसगाव शहर पो. स्टे. चे अंमलदार पोलिस शिपाई आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, नाकाबंदीकामी मदतीस आलेले नागरिक गणेश महाजन व यश पाटील हे नाकाबंदीचे बॅरेकेटस लागल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. अशाप्रकारे सर्व पोलिस अंमलदारानी जिवाची पर्वा न करता पाठलाग करुन डिझेल चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.